फानुकचा जादुई प्रोग्रॅम

06 Sep 2021 16:47:33
क्लिष्ट भूमिती असलेल्या यंत्रभागांचे यंत्रण नेहमीच आव्हानात्मक असते. हे यंत्रण सी.एन.सी. मशीनवर करताना अर्थातच त्या प्रक्रियेचे प्रोग्रॅमिंग करणे हेही तितकेच आव्हानात्मक असते. मॅन्युअल प्रोग्रॅमिंगमध्ये कार्यवस्तूच्या डिझाइनमध्ये झालेले छोटे छोटे बदल यंत्रणाच्या प्रोग्रॅममध्ये घेण्यासाठी बऱ्याचवेळा संपूर्ण प्रोग्रॅम नव्याने लिहावा लागतो. हे सर्व टाळून प्रोग्रॅमिंगची प्रक्रिया सुलभ करणाऱ्या मॅक्रो प्रोग्रॅमिंगविषयी सोदाहरण माहिती देणारा हा लेख .

img00_1  H x W: 
 

जच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, कमी वेळात अधिक काम करू शकतील अशी जलद आणि अचूक सी.एन.सी. मशीन विकसित करण्यात येत आहेत. आता CAD/CAM चा वापर वाढला आहे आणि त्यापासून पुढील दोन पद्धतीने सी.एन.सी. नियंत्रणाचे प्रोग्रॅम बनविता येतात हे तुम्हाला माहीतच असेल.

 

1. मॅन्युअल प्रोग्रॅम इनपुट : यात प्रोग्रॅमर त्याच्या कौशल्यानुसार स्वत: विचार करून प्रोग्रॅम लिहितो आणि मशीनच्या कंट्रोल सिस्टिममध्ये प्रविष्ट करतो.

2. संगणकाच्या साहाय्याने उत्पादन (कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग, CAM)  यात एका अत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे संगणकामध्ये यंत्रभागाचे मॉडेल तयार केले जाते. त्यानंतर त्याचे यंत्रण करण्यासाठी काही माहिती (डेटा) पुरवून संगणकाद्वारे काही गणना (कॅल्क्युलेशन) केली जाते आणि प्रोग्रॅम बनविला जातो.

या दोन्ही पद्धती प्रचलित आहेत आणि सर्व सी.एन.सी. वापरकर्ते याच पद्धती वापरत आले आहेत. पहायला गेले, तर मॅन्युअल प्रोग्रॅम इनपुट पद्धतीमध्ये बरीच गणना करावी लागते. त्यासाठी बराच वेळ लागतो आणि एक छोटीशी चूकदेखील धोकादायक असू शकते आणि त्यामुळे मशीनमध्ये अपघात होऊ शकतो.

मॅजिक (मॅक्रो) प्रोग्रॅम हे कार्य अधिक सुलभ कसे करते आणि प्रोग्रॅममध्ये मॅक्रो व्हेरिएबलचा वापर करून कमी वेळात सुलभ प्रोग्रॅम कसा तयार करता येतो, ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू. मॅजिक प्रोग्रॅम म्हणजे मॅक्रो प्रोग्रॅम, दुसरे काहीच नाही!

 

मॅक्रो प्रोग्रॅमिंग

मॅक्रो प्रोग्रॅमिंग हा प्रोग्रॅमिंग तंत्राचा एक भाग आहे, जो मानक सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग पद्धतींमध्ये अधिक शक्ती आणि लवचिकता आणण्यासाठी अतिरिक्त नियंत्रणे आणि वैशिष्ट्ये जोडतो. सर्व सी.एन.सी. प्रणालींसाठी 'मॅक्रो' ही प्रोग्रॅमिंगची एक भाषाधारित पद्धत आहे. सी.एन.सी. प्रणालीमध्ये सामान्यतः C++ किंवा व्हिज्युअल बेसिक अशा उच्चस्तरीय भाषा, त्यांचे अनेक प्रकार आणि डेरिव्हेटिव्ह वापरले जातात. विविध संगणक अॅप्लिकेशनसाठी किंवा अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी, संगणक सॉफ्टवेअर व्यावसायिक त्यांचा सर्वत्र उपयोग करतात.

फानुक मॅक्रो ही केवळ काटेकोर परिभाषा असलेली भाषा आहे इतकेच नाही, तर ते केवळ सी.एन.सी. मशीनवर विशेष हेतूसाठी (स्पेशल पर्पज) वापरले जाणारे एक सॉफ्टवेअर आहे. तथापि, सी.एन.सी. मॅक्रो प्रोग्रॅम प्रगत संगणक भाषांमध्ये आढळणाऱ्या बऱ्याच वैशिष्ट्यांचा वापर करतात.

 

वैशिष्ट्ये

फानुक मॅक्रोमध्ये पुढील वैशिष्ट्ये असतात.

1. अंकगणित आणि बीजगणित यांच्यावर आधारित गणना

2. त्रिकोणमितीवर आधारित गणना

3. व्हेरिएबल माहिती संग्रह

4. तर्कसंगत काम (लॉजिकल ऑपरेशन)

5. लूपिंग

6. त्रुटींची तपासणी

7. अलार्म जनरेशन

8. इनपुट आणि आउटपुट आणि इतर अनेक वैशिष्ट्ये

मॅक्रो प्रोग्रॅम काही प्रमाणात मानक सी.एन.सी. प्रोग्रॅमसारखा दिसतो, परंतु त्यात नेहमी आढळत नाहीत अशी बरीच वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. मूलत: मॅक्रो प्रोग्रॅम हा एक नित्याचा सबप्रोग्रॅम म्हणून डिझाइन केलेला आहे. तो त्याच्या स्वतःच्या प्रोग्रॅम नंबर (O) अंतर्गत संग्रहित केलेला असतो. त्याला मुख्य प्रोग्रॅमद्वारे किंवा दुसऱ्या मॅक्रोद्वारे G कोड (सहसा G65) वापरून कॉल केले जाते. तथापि अगदी सोप्या स्वरूपातील मॅक्रो वैशिष्ट्ये प्रोग्रॅममध्ये मॅक्रो कॉल करतासुद्धा वापरली जाऊ शकतात.

 

आवश्यक कौशल्ये

कोणत्याही मानवी प्रयत्नांप्रमाणेच यशस्वी ग्राहकानुरूप मॅक्रो प्रोग्रॅमिंगमध्ये यंत्रशाळेतील कामाचा आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला अनुभव तर आवश्यक असतोच, त्याशिवाय काही विशिष्ट कौशल्येही आवश्यक असतात. जेव्हा मॅक्रो प्रोग्रॅमिंगची तुलना पारंपरिक सी.एन.सी. प्रोग्रॅमिंगशी केली जाते, तेव्हा स्टँडर्ड सी.एन.सी. प्रोग्रॅमिंगसाठी लागणारी सर्व कौशल्ये तर पाहिजेतच, पण त्याहूनही काही अधिक कौशल्येही असावी लागतात. स्टँडर्ड सी.एन.सी. प्रोग्रॅमिंगसाठी प्रोग्रॅमरला यंत्रशाळेतील वातावरणातल्या आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींव्यतिरिक्त बऱ्याच नवीन गोष्टीही समजून घ्याव्या लागतात. कामाचा अनुभव ही एक अमूल्य संपत्ती आहे. मॅक्रो प्रोग्रॅम सुरू करण्याशी संबंधित सर्व कौशल्ये पुढे थोडक्यात दिली आहेत.

1. सी.एन.सी. मशीन आणि कंट्रोल : कंट्रोल ऑपरेशन प्रोग्रॅमिंग

2. यंत्रण कौशल्य : यंत्रण कसे करावे?

3. मूलभूत गणिती कौशल्ये : गणना, सूत्रे

4. प्रोग्रॅम संरचना विकसन कौशल्ये : सुविधा आणि अनुकूलता

5. ऑफसेट आणि टूल भरपाई (कॉम्पेन्सेशन) अॅप्लिकेशन कौशल्ये : विविध समायोजने

6. स्थिर आवर्तने (फिक्स्ड् सायकल) : ती कशी कार्य करतात याची तपशीलवार माहिती

7. मल्टीनेस्टिंग पद्धती समाविष्ट असलेले सबप्रोग्रॅम

8. सिस्टिम पॅरामीटर, त्यांचे हेतू आणि कार्ये

यशस्वी सी.एन.सी. कस्टम मॅक्रो प्रोग्रॅमर होण्यासाठी संगणकीय भाषांचे जुजबी ज्ञानसुद्धा पुरेसे असते. पूर्वी उल्लेख केलेल्या व्हिज्युअल बेसिक, C++, ओल्ड पास्कल डेल्फी, लिस्प टी-इन, ऑटोकॅड आणि इतर बऱ्याच भाषांचे ज्ञान, मॅक्रो शिकण्यासाठी उत्कृष्ट पाया तयार करतात.

G कोड आणि M कोडचे सखोल ज्ञान असणे ही मूलभूत आवश्यकता आहे. सबप्रोग्रॅमचे उच्चस्तरीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. सबप्रोग्रॅम ही मॅक्रो विकासाची पहिली तार्किक पायरी आहे.

आपल्याकडे मॅक्रो पर्याय इन्स्टॉल केलेला आहे का, ते तपासून पहा

आता आपणास मॅक्रो म्हणजे काय त्याबद्दल कल्पना नसली तरीही आपण वापरत असलेल्या नियंत्रण प्रणालीमध्ये (कंट्रोल सिस्टिम) मॅक्रो पर्याय इन्स्टॉल केलेला आहे की नाही, हे आपण मॅक्रो प्रोग्रॅम लिहिण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे. हे शोधण्याचा एक अगदी सोपा मार्ग आहे आणि त्यासाठी कोणत्याही विशेष प्रोग्रॅमची आवश्यकता नाही. सी.एन.सी. मशीनला MDI (मॅन्युअल डेटा इनपुट) मोडवर सेट करा आणि पुढील आदेश (कमांड) टाइप करा: #101 = 1

जेव्हा आपण सायकल स्टार्ट बटण दाबाल, तेव्हा दोनपैकी एक शक्यता उद्भवेल. जर कंट्रोल सिस्टिम कंट्रोल (?) किंवा एरर अशी स्थिती दाखविता सिंटॅक्सची आज्ञा स्वीकारत असेल, तर त्याचा अर्थ असा की मॅक्रो पर्याय इन्स्टॉल झाला आहे. परंतु, जर कंट्रोल सिस्टिम अलार्म संदेश (बहुतेकवेळा 'सिंटॅक्समध्ये त्रुटी' किंवा 'पत्ता आढळला नाही' असा संदेश असतो) देत असेल, तर त्या कंट्रोलमध्ये मॅक्रो पर्याय इन्स्टॉल केलेला नाही. खात्री करून घ्या की, वरील उदाहरणात दाखविल्यानुसार डेटा प्रविष्ट केलेला आहे. त्यात # हे चिन्ह समाविष्ट असले पाहिजे. त्याप्रमाणे, व्हेरिएबल आणि त्याचे मूल्य बरोबर असले पाहिजे. त्यात स्पेस किंवा अन्य कोणतीही चूक नसली पाहिजे, आम्ही मॅक्रोची उपलब्धता तपासण्याचा एक थेट मार्ग दाखविला आहे. # या चिन्हाला चल (व्हेरिएबल) म्हणतात.

 

मॅक्रो व्हेरिएबलचे प्रकार

तक्ता क्र. 1 मध्ये दाखविलेले मॅक्रो व्हेरिएबल सर्व फानुक पद्धतींमध्ये (मॉडेल्स) कार्य करतात. त्यांना एकूण 4 भागांमध्ये विभागले जाते.

 

img01_1  H x W: 
 

तक्ता क्र. 1 : व्हेरिएबलचे प्रकार

 

मॅक्रो व्हेरिएबल हे त्यांच्या सुरुवातीच्या असाइनमेन्टमध्ये आणि मॅक्रो बॉडीतील त्यांच्या वापरामध्ये कस्टम मॅक्रोजचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कस्टम मॅक्रो हे व्हेरिएबलवर आधारित असतात, म्हणून मुळात व्हेरिएबल म्हणजे काय, त्यावर एक नजर टाकणे आवश्यक आहे. व्हेरिएबलची व्याख्या गणितीय परिभाषेत पुढीलप्रमाणे केली जाऊ शकते. व्हेरिएबल हे एक गणितातील परिमाण असते, जे त्याच्या नियुक्त केलेल्या पल्ल्यात आणि स्वरूपात (रेंज आणि फॉरमॅट) कोणतेही मूल्य घेऊ शकते.

 

img01_1  H x W:
 

चित्र क्र. 1 : नमुना यंत्रभाग 

 

गणना, लूप, फंक्शन, बूलियन आणि फॉरमॅट तक्ता क्र. 2 मध्ये दिले आहेत.

तक्ता क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे, प्रोग्रॅम मॅक्रोजचा वापर करून फॉरमॅट लिहिता येऊ शकतात, ज्यांचा वापर करून बऱ्याच वेगवेगळ्या गणना, लूप आणि तर्कसंगत कामे करता येतात.

 

imgT2_1  H x W: 
 

तक्ता क्र. 2 : मॅक्रोजमध्ये वापरले जाणारे फॉरमॅट

 

 

मॅन्युअल प्रोग्रॅम आणि मॅक्रो प्रोग्रॅमची तुलना आणि मॅक्रो प्रोग्रॅमचे फायदे

प्रोग्रॅम A1 म्हणून दाखविलेला, सी.एन.सी. लेथवर 15 मिमी. रफ फेसिंगसाठी (चित्र क्र. 1) लागणारा मॅन्युअल फेसिंग प्रोग्रॅम 74 ब्लॉकचा आहे. त्यात लेखन अधिक आहे आणि लागणारा आवर्तन काळसुद्धा जास्त आहे. तुलनेमध्ये मॅक्रो प्रोग्रॅममध्ये (प्रोग्रॅम B1) थोडीशी गणना करून आणि लूप बनवून तेच काम कमी लेखनाद्वारे आणि कमी आवर्तन काळात होते. एवढेच नाही, तर या प्रोग्रॅममधील 4 ते 5 ओळींमध्ये थोडा फेरफार करून त्याचा उपयोग दुसऱ्या यंत्रभागासाठीसुद्धा करता येईल. नव्या प्रोग्रॅमचे लांबलचक लेखन करण्याऐवजी हा प्रोग्रॅम कॉपी करून त्यातील काही ओळींमध्ये सुधारणा करून हाच फेसिंग प्रोग्रॅम आपण दुसऱ्या यंत्रभागासाठी वापरू शकतो. फक्त वेगवेगळ्या आकारांची मापे त्यात देऊन, अतिशय पटकन नवा प्रोग्रॅम बनविता येतो. हे फेसिंग प्रोग्रॅमचे एक उदाहरण आहे.

 

imgT3_1  H x W: 
 

तक्ता क्र. 3 : मॅन्युअल आणि मॅक्रो प्रोग्रॅम

 

याचप्रमाणे सर्व वेगवेगळ्या कामांसाठी या फंक्शनमध्ये थोडी गणना आणि लूप, फॉरमॅट आणि फंक्शन जोडून कमी लेखनात बरेच काम केले जाऊ शकते. वरील मॅक्रो प्रोग्रॅममध्ये फक्त # 110, # 111, # 112 आणि # 113 यांच्यात बदल करून वेगवेगळ्या यंत्रभागांसाठी याच फेसिंग प्रोग्रॅमद्वारे यंत्रण करता येते.

तक्ता क्र. 4 मध्ये दिलेल्या तुलना आणि मॅक्रो प्रोग्रॅमचे फायदे पाहिल्यावर आपण मॅक्रो प्रोग्रॅमला मॅजिक प्रोग्रॅमदेखील म्हणू शकता.

 

imgT4_1  H x W: 
 

तक्ता क्र. 4 : मॅन्युअल आणि मॅक्रो प्रोग्रॅमची तुलना

 

 

खबरदारी

1. मॅक्रो प्रोग्रॅम तयार करण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी, तो नीट समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

2. मशीन पॅरामीटर समजून घेतल्यानंतरच त्यामध्ये बदल करा.

3. मॅक्रो सुरू करण्यापूर्वी तो नीट समजून घ्या आणि एखाद्या सल्लागाराद्वारे आपला मॅक्रो प्रोग्रॅम तपासून घ्या.

4. मॅक्रोमध्ये गणना करताना सावधगिरी बाळगा.

5. आपल्या मशीन निर्मात्याचा सल्ला घ्या, त्यांना मॅक्रोबद्दल विचारा आणि त्यांच्याकडून जाणून घ्या.

आपण खबरदारी घेऊन चांगले मॅजिक (मॅक्रो) प्रोग्रॅम करू शकता.

 

 

 

 

9662417334

prajeshjolapara@gmail.com
प्रजेश आर. जोलापरा यांना सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग आणि यंत्रणाचा 10 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते पॅरामाउंट पिस्टन (जामनगर, गुजरात) येथे सी.एन.सी. मशीन शॉप इनचार्ज म्हणून कार्यरत आहेत.
 
 

 

 
 
 

 

 
 
Powered By Sangraha 9.0