अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या : 10

12 Feb 2022 11:13:32

amit 
‘अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या’ या लेखमालेअंतर्गत आपण ड्रॉईंग तयार करताना येणाऱ्या निरनिराळ्या अडचणी आणि त्यावर कमीतकमी वेळेत सहजपणे कशी मात करता येईल, यासंबंधीच्या संयुक्तिक कमांड सोदाहरण अभ्यासत आहोत. याचाच एक भाग म्हणून या पूर्वीच्या (धातुकाम : ऑक्टोबर 2018 अंक) लेखामध्ये ड्रॉईंग तयार करून झाल्यावर आयत्या वेळी करावे लागणारे महत्त्वाचे बदल ‘TEXTMASK’ कमांडच्या वापराने आपण कसे घडवून आणू शकतो हे बघितले. एखादा आकार काढल्यानंतर त्यात टीप देण्यासाठी किंवा तो आकार पाठीमागील बाजूस तसाच ठेवून त्यामध्ये अक्षरासाठी जागा तयार करून घेणे, जेणेकरून ते अक्षर ठळकपणे दर्शविता येईल, या प्रकारचे आरेखन करण्यासाठी ‘TEXTMASK’ या कमांडचा चपखल उपयोग करून आपला वेळ वाचविता येतो. या कमांडमुळे सुटसुटीतपणाही अनुभवाला येतो.
 
या लेखात आपण एका विशिष्ट चिन्हाचा वापर करण्यासाठीची अगदी सहजसोपी पद्धत कशी अवलंबिता येईल ते सोदाहरण पाहणार आहोत.

ब्रेक लाईन चिन्ह
ब्रेक लाईन कुठे आणि कशाकरिता वापरावी यासंबंधीची माहिती आपण घेणार आहोतच, परंतु त्याचे एकंदरीत स्वरूप आधी समजून घेऊ. ब्रेक लाईनच्या चिन्हांचे दोन मुख्य प्रकार आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. हे प्रकार चित्र क्र. 1 मध्ये दाखविले आहेत.

amit
मागील काही लेखांमधून आपण प्लँट लेआऊट जनरल ॲरेंजमेंट ड्रॉईंग करताना आवश्यक असणाऱ्या क्लृप्त्या बघत आलो आहोत. त्यासाठी लागणाऱ्या कमांडचा अभ्यास करून आपण त्यामध्ये झालेले विविध बदलदेखील अंगिकारले. अशाच प्रकारची ड्रॉईंग करताना आपल्याला ‘ब्रेक लाईन’चा वापर करावा लागतो. तो का करावा लागतो याचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
 
एखाद्या वस्तूचे रेखाटन करताना उपलब्ध जागेच्या मर्यादेमुळे वस्तुच्या अपेक्षित लांबीपेक्षा ती लांबी कमी रेखाटली असेल, तर अशावेळी ब्रेक लाईन दर्शवून त्याचे एकूण माप देत असतो. यामुळे ड्रॉईंग वाचणाऱ्या व्यक्तीला त्याचे निश्चित आकलन होते आणि त्या वस्तुची पूर्ण स्वरुपातील आभासी प्रतिमा ड्रॉईंग वाचणाऱ्याच्या मनात निर्माण होते. ड्रॉईंग करताना त्याचा निश्चितच लाभ होतो. ही कमांड साधारणतः मोठ्या आकाराच्या ड्रॉईंगकरिता वापरता येते. एखादे ड्रॉईंग त्या आरेखनाच्या साच्यात (A1, A2, A3) व्यवस्थितपणे सामाविण्यासाठी उपयोगात आणली जाते. हे प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी चित्र क्र. 2 अभ्यासता येईल.

amit
‘ब्रेक लाईन’ कमांड कशी वापरावी यासंबंधीचे निर्देश पुढील टप्प्यानुसार अधोरेखित केले आहेत.
• Express tools मध्ये ‘ब्रेक लाईन सिम्बॉल’ अशी टॅब (बटन) आहे किंवा कमांड लाईनमध्ये ‘BREAKLINE’ असे टाईप केले असता ही कमांड प्रत्यक्षात येऊ शकते.
• ब्रेक लाईन तयार करण्यासाठीचा सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू निवडावा.
• ब्रेक लाईन चिन्हाचे ठिकाण निवडावे. शक्यतो ब्रेक लाईन चिन्ह मध्यबिंदूवर स्थित असते.
• अशाप्रकारे आपण हे चिन्ह सोप्या पद्धतीने अंमलात आणू शकतो.
 
‘ब्रेक लाईन’ कमांडमुळे होणारे फायदे
• ब्रेक लाईन चिन्हाचे आरेखन करण्याची गरज नाही.
• काहीजण असेही करतील की, ब्रेक लाईन चिन्ह काढून त्याचे ब्लॉकमध्ये रूपांतर करतील आणि लायब्ररीमध्ये साठवून ठेऊन ज्यावेळी या चिन्हाची गरज भासेल त्यावेळी तो ब्लॉक आवश्यक त्या ठिकाणी बसवतील. परंतु प्रत्येकवेळी वस्तू वेगळ्या आकाराची आणि क्षेत्रफळाची असेल, त्यावेळी हे ब्लॉक स्वरुपातील चिन्ह मर्यादित ठरेल.
• चिन्हाचा आकार आपण ठरवू शकतो.
• वस्तू काढून झाल्यावरही आपण हे चिन्ह त्यामध्ये सामावून घेऊ शकतो.
• हे सर्व करताना मूळ ड्रॉईंगमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही आणि ड्रॉईंगला हानी पोहोचत नाही. त्यामुळे ड्रॉईंग जसेच्या तसे सुरक्षित राहते.
• वेळेची बचत होते.
• किचकटपणा आपोआपच टाळला जातो.
थोडीफार काळजी घेतल्यास दैनंदिन आरेखन करताना आपण या कमांडचा अगदी सर्रास वापर करू शकतो. जसे की, आजूबाजूला असलेल्या वस्तू किंवा मापनाची रेषा यांना धक्का लागू नये याची खात्री करावी.
या लेखात आपण साध्या सोप्या परंतु नेहमी लागणाऱ्या कमांडचा अभ्यास केला. यामुळे चिन्ह काढण्याच्या वेळेत बचत होते. चिन्हामध्ये हवा तसा वस्तुप्रमाणे बदल करता येतो. ड्रॉईंग तयार झाल्यानंतरही योग्य तो परिणाम साध्य करता येतो. पुढील लेखात अशाच प्रकारच्या इतर काही आधुनिक कमांड आपण पाहणार आहोत.
Powered By Sangraha 9.0