मागील अंकात आपण ’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आय.ओ.टी. - loT) किंवा ’इंडस्ट्री 4.0’ या विषयाची तोंडओळख करून घेतली होती. मोठमोठ्या उद्योगांमध्ये अद्ययावत आणि प्रभावी सी.एन.सी. मशिन्स, अत्याधुनिक तपासणी यंत्रांच्या वापराबरोबरच ओरॅकल किंवा सॅप या सारख्या कार्यप्रणाली अतिशय किफायतशीरपणे वापरल्या जाऊ लागल्या आहेत. या सर्व दैनंदिन कामकाजात मानवी हस्तक्षेपामुळे (ह्युमन एलिमेंट) होणाऱ्या संभाव्य चुका किंवा नुकसान कमी करणे हे धोरण सर्रास वापरले गेलेले दिसते. याचाच परिणाम म्हणून बऱ्याच उद्योगांचा प्रगतीचा आलेख हा चढत्या स्वरुपाचा पहायला मिळतो. उद्योगधंद्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला आय.ओ.टी. हेदेखील तितक्याच सहजपणे आणि प्रभावीपणे वापरले गेलेले दिसेल.
पण याच पार्श्वभूमीवर बहुतांशी लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये दिसणारे चित्र तितकेसे मिळतेजुळते असतेच असे नाही. ते चित्र बऱ्याचवेळा परिस्थितीसापेक्ष व व्यक्तीसापेक्ष असते. नव्याने जम बसवणाऱ्या किंवा उद्योगाची वाढ करणाऱ्या एखाद्या लघु उद्योजकापुढे जी अनेक आव्हाने असतात त्यापैकी काही आजूबाजूच्या उद्योग जगतातील परिस्थितीशी निगडित असतात. उदाहरणार्थ,
• व्यावसायिक स्पर्धा, ग्राहकांच्या अटीसह विविध मागण्या.
• व्यापाऱ्यांशी देवघेवीचे व्यवहार करताना होणारी कसरत.
• या सर्वांची आर्थिक सांगड घालताना होणारी दमछाक.
तर काही त्याच्याच उद्योगाच्या आवारात रोजच्या घडणाऱ्या घडामोडींवर नियंत्रण आणण्याची किंवा त्यात वरचेवर सातत्याने सुधारणा घडवून आणण्याची असतात. उदाहरणार्थ,
• उद्योगातील सर्व मशिन्स पूर्ण क्षमतेने वापरली जातील अशापद्धतीने त्यावरील कार्यपद्धतींचा जम बसवणे.
• मशिन्सच्या देखभालीचा व दुरुस्तीचा खर्च आवाक्यात ठेवणे.
• प्रशिक्षित व कुशल कामगार वर्ग मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे
• कामगारांकडून त्यांच्या पूर्ण क्षमतेने, सातत्यपूर्ण गुणवत्तेचे उत्पादन ठराविक वेळेत करवून घेणे.
अशा अजून कित्येक....
या सर्व अंतर्गत आणि बाह्य आव्हानांवर त्या उद्योजकाला त्याच्याकडे असलेल्या माफक साधनसामुग्रीच्या साहाय्याने एकट्यानेच सामना करावा लागतो. या सर्व आव्हानांत सर्वात महत्त्वाचे आणि दररोज सामना करावा लागणारे आव्हान म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाकडून मिळवायची उत्पादकता व गुणवत्ता हे होय. बहुतांशी लघुउद्योगात अशा कामासाठी सुपरवायझर किंवा फोरमन अशा जबाबदार व्यक्तीची नेमणूक केलेली असते. कामगाराला दिलेले काम, त्याच्याकडून झालेले उत्पादन, ते करत असताना झालेले रिजेक्शन, त्याला कामात आलेल्या अडचणी, मशिन्सची देखभाल व दुरुस्ती यामध्ये वाया गेलेला वेळ अशा सारख्या रोजच्या नोंदी रजिस्टरमध्ये किंवा संगणकावर एक्सेल शीटमध्ये केल्या जातात. या नोंदींचा आढावा रोज घेणे अपेक्षित असले तरी कामाच्या प्राधान्यानुसार तो घेतला जातोच असे नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे केलेल्या नोंदीतून अपेक्षित असलेला अहवाल काढणे हे कुणातरी माणसाला करावे लागते व ते थोडे जिकीरीचे असते. हाच आढावा सवडीने काही दिवसांनंतर घ्यायचा म्हटले तर रोज केलेल्या नोंदींचे पुन्हा संकलन करुन त्यांचे सुलभ होतील असे अहवाल काढून ते काम करावे लागते. यामध्ये पुनरुक्ती होऊन त्या सुपरवायझरचा किंवा मालकाचा वेळ व श्रम वाया जातात. अशाप्रकारे, मनात असो व नसो, या अंतर्गत आव्हानांचा सामना करता करता त्या उद्योजकाचा जीव मेटाकुटीला येतो. आणि नकळत यात दिरंगाई होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी ‘क्लाऊड’ ची मदत घेऊन लघु उद्योगांसाठीसुद्धा काही कार्यप्रणाली विकसित केल्या गेल्या आहेत
आपण आता ‘क्लाऊड’ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ या.
‘क्लाऊड’ हा शब्द आजकाल संगणक क्षेत्रात ‘संगणकाचे जाळे’ या अर्थी रूपक म्हणून वापरला जातो आणि संगणकाच्या बोली भाषेत वारंवार बोलला जातो. यामध्ये सेवा पुरवणारा (सर्व्हिस प्रोव्हायडर), सेवा घेणारा (क्लायंट) आणि त्यांच्यात आदान-प्रदान होणारी माहिती यांचा अंतर्भाव असतो. यामध्ये माहितीचा साठा करुन ठेवणारा घटक (सर्व्हर), माहितीचा साठा (स्टोरेज) आणि त्या माहितीचा अपेक्षित आणि योग्य असा वापर (अप्लिकेशन) या सर्व सेवा संगणकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही शुल्क घेऊन ग्राहकाला दिल्या जातात. या सर्व पायाभूत सुविधांची मालकी किंवा संपूर्ण जबाबदारी ही सेवा पुरवणाऱ्याकडे असते. दूरध्वनी सेवा किंवा वीज वितरण सेवा यासारख्या सेवांशी याचे साम्य आढळते. यामध्ये अचूक व अखंडित सेवा याबरोबरच माहितीच्या गुप्ततेची हमी पण द्यावी लागते. यासाठी योग्य ते कायदेशीर करारपत्र केले जातात. संगणक तंत्रज्ञानाद्वारे सेवा देण्यामध्ये क्लाऊडचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, ग्राहकाला या तंत्रज्ञानाची सखोल माहिती न घेता किंवा त्यात प्राविण्य न मिळवता त्याचे फायदे मिळावेत असा आहे. क्लाऊडचा रोख हा त्याच्या ग्राहकाने संगणक तंत्रज्ञानाच्या जंजाळात किंवा निरनिराळ्या अडथळ्यात विनाकारण न अडकता त्यांनी त्यांच्या मुख्य व्यवसायात जास्त लक्ष केंद्रित करावे याकडे आहे.
पुण्यातील कोविद् - (kovid) या संगणक प्रणाली क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने या प्रश्नावर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून, तज्ञ ग्राहकांशी चर्चा करून, सखोल अभ्यासाअंती कार्यक्षमता मागोवा प्रणाली - 'PET’ (Production Efficiency Tracking System) नावाचे एक उत्पादन (प्रॉडक्ट) तयार केले आहे.
’कोविद्’ हा संस्कृत शब्द असून, त्याचा शब्दश: अर्थ जाणकार, अनुभवी आणि संवेदनाशील लोकांचा समूह असा आहे. ’कोविद्’ या संस्थेचे नेतृत्व स्वीकारलेले संदीप महाजन त्यांची ‘PET’ ही प्रणाली विकसित करताना त्यांच्या अनुभवाबद्दल असे सांगतात की, या संगणक प्रणालीत यंत्रण होणाऱ्या कार्यवस्तूचे नाव, त्याचा ड्राईंग नंबर, मशिनचे नाव, त्याचा नंबर, कामगाराचे नाव, कामाची पाळी तसेच मशिन बंद पडण्याची वेगवेगळी कारणे, कार्यवस्तू रिजेक्ट होण्याची संभाव्य कारणे इ. गोष्टी सांकेतिक शब्दात (कोड वर्डस) अगोदरच तयार करुन ठेवलेल्या असतात. सुपरवायझरने फक्त दररोज सांकेतिक शब्द निवडून संगणकात नोंद करायची, इतपत ते सोपे व सुटसुटीत केले आहे. एकदा का या नोंदी झाल्या की, मग झालेल्या नोंदींचा उपयोग करुन वेगवेगळ्या निकषांवर पाहिजे ते अहवाल (रिपोर्टस) ठरवून दिलेल्या चौकटीत मिळू शकतात. या अहवालातील माहितीपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. उदाहरणार्थ, पाय चार्ट, बार चार्ट यासारखे दृश्य परिणाम दाखवणारे आलेख. वेगवेगळे फिल्टर लावून अनावश्यक माहिती दडवता पण येते. भरलेल्या माहितीवरून हे सर्व अहवाल अतिशय कमी श्रमात व कमी वेळात नुसते तयारच होत नाहीत तर ते पुढे वरिष्ठ व्यवस्थापनास ई-मेल द्वारे एका ठरवून दिलेल्यावेळी (ऑटो ई-मेल) पाठवण्याचीही व्यवस्था या प्रणालीत करण्यात आली आहे. आत्ताच्या प्रगत तंत्रज्ञानानुसार तो अहवाल मोबाईलवर पण पाठवता येतो. त्यामुळे फक्त कार्यालयात बसूनच याचा वापर करता येतो हे बंधनदेखील रहात नाही. असा वास्तविक वेळेचा अहवाल (रियल टाईम डेटा) वेळेवर हाती आल्यामुळे कार्यक्षमता वाढीसाठी योग्य निर्णय व्यवस्थापन मंडळ घेऊ शकते व उद्योगाची कामगिरी उंचावता येते.
’कोविद्’ या कार्यप्रणालीचे संगणकावर दिसणारे निरनिराळे चित्रस्वरूपातील स्क्रीनशॉट्स आपल्या माहितीसाठी आलेख स्वरुपात दिले आहेत. (आलेख क्र. 1 ते 6)
सदर प्रणाली नांदेडफाटा औद्योगिक वसाहतीतील समर्थ इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या लघु उद्योगामध्ये त्यांच्या उद्योगाला साजेसे किरकोळ फेरफार करून गेले सव्वा वर्ष अतिशय सुलभतेने आणि परिणामकारकरित्त्या राबवली जात आहे.
प्रशांत शेटे यांनी समर्थ इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा लघुउद्योग नांदेडफाटा येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 25 वर्षांपूर्वी सुरु केला. सध्या या उद्योगाने वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांना गोल आकाराच्या कार्यवस्तूंचा (बार कांपोनंटस्) पुरवठा केला आहे. त्यांच्याकडे सुमारे 2-3 वर्षांपूर्वी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे परिस्थिती उद्भवली होती. स्वत:च्या उद्योगाच्या कामगिरीचा वेगवेगळ्या निकषांवर आढावा घेणे जिकीरीचे व वेळखाऊ झाले होते. सुमारे दीड वर्षापूर्वी शेटे यांच्या पाहण्यात कोविद् ही कार्यप्रणाली आली. प्रथमदर्शनीचे मूल्यमापन झाल्यावर स्वत:च्या लघुउद्योगासाठी ही कार्यप्रणाली जरूर ते फेरफार करुन वापरण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीमुळे यंत्रसामुग्रीवरील कामाचे व मनुष्यबळाचे योग्य नियोजन होऊन ग्राहकाला ठरलेल्या वेळी माल पुरवणे हे काम सुलभतेने होऊन त्यांचा ड्यू-डेट परफॉर्मन्स सुधारला. मुख्य म्हणजे हे सर्व काम करणाऱ्या सुपरवायझरची धांदल व गडबड कमी होऊन तो अतिशय अचूकतेने, सहजतेने व आत्मविेशासाने त्याचे योगदान देऊ लागला.
तेथील उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडील रिजेक्शनवर कसे नियंत्रण आणले ते थोडक्यात पाहू या. रोजच्या डेटाची या प्रणालीत नियमित नोंद केल्यावर पहिल्या महिन्यातील रिजेक्शनची माहिती त्यातून माफक वेळेत मिळवून ती ’एक्सेल’मध्ये पाठवून आलेख काढला गेला. समस्या निवारण तंत्राचा (प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक) वापर करुन पॅरेटो ॲनालिसिस केले गेले.
(आलेख क्र. 4)
यामध्ये कार्यवस्तूंना खड्डे पडणे (डेंटस्) या कारणामुळे सर्वात जास्त रिजेक्शन झाले होते.
या गोष्टीची कारणमीमांसा केली असता असे लक्षात आले की बनवलेल्या कार्यवस्तू ग्राहकाकडे पाठवेपर्यंतची हाताळण्याची पद्धत सदोष होती. तातडीने उपचार म्हणून कार्यवस्तू बनवल्या की लगेच प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ठराविक पद्धतीनेच ठेवण्याचा दंडक लगेच ठरवला गेला व अंमलात आणला गेला. पुढील काही महिने ही शिस्त बाणली गेली आहे की नाही याचा पाठपुरावा करुन ते रिजेक्शन आटोक्यात आणले गेले. (आलेख क्र. 5)
याच रीतीने त्या आलेखात निदर्शनास आलेल्या रिजेक्शनच्या इतर कारणांवर मीमांसा करुन आवश्यक ते बदल केले गेले. आलेख नं. 6 मध्ये सुधारणा झालेली आणि टिकलेली दिसून येईल. या कालावधीत यंत्रण करुन पुरवठा केलेल्या कार्यवस्तूंची संख्या जवळजवळ सारखीच होती. (3 ते 5 % फरक)
समर्थ इंजिनिअरींग सर्व्हिसेसचे शेटे सांगतात की, ’ सुमारे दीड वर्षांपूर्वी कार्यान्वित केलेल्या या प्रणालीचा वापर सुपरवायझरच्या पातळीवर अतिशय सुलभतेने केला जात असून अनेक समस्यांचे निवारण वेळच्यावेळी केले जात आहे. शिवाय आमच्याकडे असलेल्या यंत्रसामुग्रीची उपलब्धता व त्यावरील काटेकोर नियोजन याद्वारे मनुष्यबळात वाढ न करता उत्पादनात सुमारे 20 ते 25 % वाढ शक्य झाली. एकूणच आमच्या उद्योगाची कार्यक्षमता सातत्याने उंचावली जात आहे.’
‘अविरत एंटरप्राईजेस’ हा लघुउद्योग पुण्यातील नऱ्हे येथील औद्योगिक वसाहतीत गेले 10 वर्षे कार्यरत असून त्यांची खासियत म्हणजे त्यांच्याकडे गोल आकाराच्या कार्यवस्तूंना त्यांच्या व्यासावर चौकोनी, षटकोनी किंवा वेगळ्या आकाराचे यंत्रण करुन आकार देण्याची सुविधा आहे. अशाप्रकारचे मोठ्या संख्येने जॉबवर्क करुन देण्यात त्यांची मक्तेदारी आहे.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी ’अविरत एंटरप्राईजेस’कडे ग्राहकाकडून असलेल्या मागणीचा प्रचंड ओघ पाहता त्या उद्योगाचे संचालक तुषार ताकवले हे त्यांच्याकडे अजून यंत्र खरेदी करण्याच्या विचारात होते. परंतु त्यांच्याकडे वापरात असलेल्या ’कोविद्’च्या कार्यप्रणालीमुळे दररोज केलेल्या नोंदीवरून त्या आधीच्या 4-6 महिन्याच्या काळात प्रत्येक यंत्राचा कामात गुंतलेला कालावधी (मशीन एंगेजमेंट) याचा आलेख अल्पावधीत पाहता आला. त्या आलेखावरून असे निदर्शनास आले की आहे त्या यंत्रांवर कामाचे जर योग्य नियोजन केले तर पुरेपूर वापर करुन ग्राहकांची मागणी पूर्ण करता येऊ शकते. त्यामुळे नवीन यंत्रासाठी लागणारे भांडवल उभे करणे टळले. व त्याचा होणारा संभाव्य कमी वापर पण टळला.
अविरत एंटरप्राईजेसचे संचालक तुषार ताकवले त्यांच्या अनुभवातून हे व्यक्त करतात की, ’या कार्यप्रणालीच्या वापरातून जे वेगवेगळे अहवाल आवश्यक होते ते अतिशय सहजपणे व त्या त्या वेळी (रियल टाईम डेटा) मिळवता आले. माझ्याकडून होणारे समस्या निवारणाचे निर्णय हे व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) न होता वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) झाले. त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असल्याचे जाणवले. शिवाय अहवालानुसार मी माझ्या कंपनीमध्ये काम करताना काही शिस्त लावून दिली व कालांतराने एक सिस्टिम प्रस्थापित झाली. मी आता अभिमानाने सांगू शकतो की माझ्या कंपनीत सिस्टीम ओरिएंटेड ॲप्रोच आहे.’
(लेखासंदर्भात जर कोणाला काही शंका असतील अथवा सविस्तर माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या ईमेलवर संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधावा.)
अनिल अत्रे यांत्रिकी अभियंते असून उद्यम प्रकाशन प्रा. लि. कंपनीमध्ये ते पुस्तक विभागाचे संपादक आहेत.